Skip to main content


निर्माल्य (माझी आजी)

डोळे होते थकलेले
शरीर पिंपळाच्या पानाची जाळी ल्यालेले

आपल्याच माणसांच्या ओढीने, प्रेमाने, वावराने
राहिली क्रियाशील सदैव तत्परतेने

आपली दुःखे दाबताना ती दुसऱ्याचा बनली आधार
निरलस स्वभावाने आणि प्रेमाच्या धाग्याने जोडली तिने माणसे हजार

बाळा हे प्रेमाचे शब्द हक्काने ऐकावे तर तिच्याकडून
काही चूक झाली तरी माफ करणारे कोणीच नव्हते ती सोडून

दुसऱ्याचे चांगले व्हावे यासाठी झटणारी होतीच ती वेगळी
आपल्याच माणसांच्या आनंदात, समाधानी असे ती माय आगळी

समाधानाचे हसू आणि आसू कायम असे तिच्या अंतर्मनी
ती असताना निर्धास्त असायचो आम्ही, चिंताच नसे ध्यानीमनी

सोवळे आणि शास्त्र याबद्दल असे कायमच ती आग्रही
कालौघात सोवळ्याच्या निऱ्या सैल सोडताना कर्तव्याकडे दुर्लक्ष नाही

कोणाचे कोण, जवळचे कोण, कोणीच नव्हते परके
हक्काने स्वागत करणे, प्रेमाने जवळ करणे हे सगळ्यांशी होते सारखे

आई-बाबा ओरडू नयेत म्हणून सतत बिचारी करी धडपड
तरीही फटके बसलेच तर म्हणायची थांबव आता ओरड

पाहुण्यांच्या गप्पात, वयाचा विसर पडून सामील ती होत असे
कितीही आणि कुठलेही काम करताना मोठेपणी मात्र कधीच नसे

इतक्या संस्कारांची शिदोरी आम्हाला देऊन गेलीस जरी
देवाने जणू चांगले करण्यासाठी पाठविलेली देवदूतच खरी

आजीबाईचा बटवा खरंच असे तुझ्याकडे
इतकी स्मरणशक्ती पाहून अचंबित होत असू आम्ही वेडे

कित्ती कित्ती आठवणी दाटून आल्यात आज हृदयात
तू असताना ही तुझी जाणीव होती पण्‌ आज तू नाही आमच्यात..

तुझीच पोकळी भरुन काढण्यासाठी आमची विहीर आहे कोरडी
पण्‌ तशीच ऊब तुझी आजही भासे घेऊन तुझी गोधडी

आमच्या दुःखावर मायेची फुंकर घालणारी तू खरंच होतीस दुधावरची साय
आता फक्त आठवणी दुसरे हातात काय? दुसरे हातात काय?

Comments

Popular posts from this blog

|| श्री देवी ||

 

॥श्री स्वामी समर्थ॥

।।श्री लक्ष्मी प्रसन्न।।